मुंबईतील कामगार भागात सहकार व मनोरंजन या १०० वर्षापूर्वी अनोख्या वाटणाऱ्या संकल्पनांना जन्म देणाऱ्या सहकारी मनोरंजन मंडळाची शतक महोत्सवी वाटचाल म्हणजे तिच्या संस्थापकांच्या द्रष्टेपणाची दूरदृष्टीची जिवंत निशाणीच आहे. प्रसिद्ध कामगार नेते ना . म . जोशी यांनी कै. गंगाराम बाबाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवा संघाला पूरक अशा सहकारी मनोरंजन मंडळाची दि . २० सप्टेंबर १ ९ २२ रोजी स्थापना केली , ही मराठी रंगभूमीवरील एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल.
कै. आप्पासाहेब टिपणीसांच्या ‘संगीत राधामाधव’ या नाटकाने मंडळाची नाट्यसेवा सुरू झाली. इतरत्र गाजलेल्या त्राटिका, मत्स्यगंधा, पुण्यप्रभाव, भावबंधन, शारदा , संशयकल्लोळ, हाच मुलाचा बाप,सौभद्र, सावित्री इ. असंख्य नाटकांबरोबरच कै. गं . ब . कदम यांचे प्रचंड गाजलेले नाटक ‘ ललाटलेख ‘, कै. दाजीबा परब यांचे ‘ गिरणगावात ‘ ही मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्यांची नाटकं, तसेच मामा वरेरकरांचे ‘ द्वारकेचा राजा ‘ , रा बा गावडे लिखित ‘अशी होती मराठी माणसं’ इ. खास मंडळाकरिता लिहिलेल्या नाटकांचे प्रयोगही यशस्वीरित्या केले गेले.
शंभर वर्षापूर्वीचा गिरणगाव म्हणजे बारा बारा तास गिरण्या कारखान्यातून घाम गाळणाऱ्या, पण श्रमप्रतिष्ठा नसलेल्या मुंबईच्या कामगारांचा दुर्लक्षित मागास विभाग. त्यांच्या दुःख, दैन्याला कोणी वालीच नव्हता. दारु, जुगार असली व्यसने अन पठाणी कर्जाचा विळखा यांच्या कर्दमात तो अधिकाधिक रुतत चालला होता .
अशा स्थितीत ‘ सांस्कृतिक उन्नती वगैरे कोणाला सुचणं दूरवर शक्य नव्हतं. अशा सर्वस्वी प्रतिकुल परिस्थितीत या कामगारांमधील कलागुणांना वाव मिळावा व त्यांची सामाजिक व सांस्कृतिक जाण वाढावी व व्यसनांपासून दूर व्हावा म्हणून सहकारी मनोरंजन मंडळाची स्थापना करण्यात आली. दामोदर हॉल बांधल्यानंतर मंडळास हक्काचा निवारा मिळाला आणि मग व्यावसायिकांच्या दिंड्यासुद्धा या नाट्यपंढरीच्या छायेला आल्या.
ल. ग. सुळे लिखित ‘लग्नसोहळा’ या नाटकापासून स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच करण्याचा पुरस्कार मंडळाने सुरु केला. नटवर्य नानासाहेब फाटक, मा . दत्ताराम, भालचंद्र पेंढारकर, राजाराम शिंदे, बाबासाहेब नाईक, मनोहर चव्हाण, अनंत दामले, शंकर घाणेकर, श्री. जोगळेकर, किशोरी पाठक, सौ. ललिता पेंढारकर, शालिनी भालेकर, सुमन मराठे, जयश्री शेजवाडकर, कुसूम चव्हाण असे असंख्य कलाकार वसंत शेणई, बाळ पवार सारखे दिग्दर्शक, नट, पार्वती कुमार सारखे नृत्यदिग्दर्शक हे मंडळाचे सभासद मराठी रंगभूमीवर गाजले व त्यांनी मंडळाचे सभासदत्व अभिमानाने मिरविले.
नुसती नाटकेच करून मंडळ थांबले नाही, तर अत्यल्प मोबदल्यात आपदस्तांना, दुष्काळ पीडितांना व नाट्यसंस्थाना वेळोवेळी आर्थिक मदत केली.
१९३५ पर्यंत गंधर्वयुगाचा प्रभाव मराठी रंगभूमीवर होता . त्यानंतर चित्रपटाच्या आक्रमणाने मोठमोठे नाट्यदिग्गज उन्मळून पडले, अशा उतरत्या कालखंडात १९६० पर्यंत कामगार रंगभूमीने मराठी रंगभूमीला तगवले, जगवले व वर्धिष्णू ठेवले व त्यात सहकारी मनोरंजन मंडळाचा वाटा सिंहाचा होता.